शाळा परिसरात उपद्रव करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी :
वरणगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात फटाक्यांसारखा मोठा आवाज करून दहशत निर्माण करणाऱ्या १५ बुलेटस्वारांवर कारवाई करत त्यांच्या वाहनांवरील मॉडिफाइड सायलेंसर जप्त करण्यात आले आहेत.
वरणगाव शहरात विशेषतः सायंकाळी सातनंतर तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन मार्ग, तसेच भुसावळ, मुक्ताईनगर आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बुलेटस्वारांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. भरधाव वेगाने धावणाऱ्या या दुचाक्यांमुळे अचानक होणारा प्रचंड आवाज रस्त्यावरील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होता. अनेक वेळा अपघात होण्याची भीतीही निर्माण झाली होती.
सकाळच्या मॉर्निंग वॉकदरम्यान तसेच सायंकाळी कुटुंबीयांसोबत फिरायला येणाऱ्या नागरिकांना या प्रकारामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तर दुसरीकडे खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. ध्वनीप्रदूषणासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला होता.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी विशेष मोहीम हाती घेत शहरात धडक कारवाई सुरू केली. या मोहिमेदरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना थांबवून त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत मॉडिफाइड सायलेंसर आढळल्याने ते तात्काळ काढून जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण १५ बुलेटस्वारांवर कठोर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, सचिन गुमळकर, सकाराम कोळी, सचिन बारी यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे बुलेटस्वारांमध्ये चांगलाच धसका निर्माण झाला असून, शहरात शांतता आणि शिस्त राखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
