भरउन्हात कष्टकऱ्यांना पोलिसांची मायेची सावली; जळगाव पोलिसांचा संवेदनशील उपक्रम
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत असून तापमानाचा पारा तब्बल ४५ अंशांच्या आसपास पोहोचला आहे. अशा कडक उन्हातही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक छोटे विक्रेते रस्त्याच्या कडेला दिवसभर व्यवसाय करताना दिसतात. या कष्टकरी हातांच्या संघर्षाची दखल घेत जळगाव पोलीस दलाने एक हृदयस्पर्शी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला आहे.
जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने भरउन्हात उभे राहून व्यवसाय करणाऱ्या २० निवडक किरकोळ विक्रेत्यांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून त्यांना मोठ्या छत्र्या तसेच गार पाणी साठवण्यासाठी दर्जेदार ‘मिल्टन’ कंपनीच्या वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे उन्हाच्या झळा सहन करत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
या उपक्रमासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने अशा विक्रेत्यांची निवड केली होती, जे प्रत्यक्ष दिवसभर उन्हात बसून किरकोळ विक्री करतात. उन्हाची पर्वा न करता संसाराचा गाडा ओढणाऱ्या या कष्टकरी वर्गाला मदतीचा हात देण्यामागे सामाजिक संवेदनशीलतेची भावना असल्याचे यावेळी दिसून आले.
“अरे संसार संसार, कसा नाही गड्या मान?
एका घासाला कागा, दुसरा सुके उभा प्राण!”
बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळींची जणू प्रत्यक्ष अनुभूतीच या प्रसंगी येत होती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उन्हातान्हात मेहनत करणाऱ्या या विक्रेत्यांना थोडासा आधार मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याबाबत आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देखील देण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, “पोलीस दल हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते. अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
पोलिसांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे जळगाव शहरात सर्व स्तरांतून स्वागत होत असून, या उपक्रमामुळे भरउन्हात व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.
