‘आधी कर्तव्य, मग अधिकार’; डॉ. राधेश्याम चौधरींचा आदर्श संदेश
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
राजकारणात पद मिळाल्यानंतर अधिकारांची अपेक्षा व्यक्त करणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पदाचा मान स्वीकारतानाच कर्तव्यालाच प्राधान्य देत एक वेगळाच आदर्श नागरिकांसमोर ठेवला आहे. महानगरपालिकेचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी तत्काळ आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वैयक्तिक मालमत्ता कर आगाऊ भरून जबाबदार लोकप्रतिनिधीची भूमिका अधोरेखित केली.
जळगाव महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉ. चौधरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. महानगरपालिका आयुक्तांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता थेट कर विभागात जाऊन मालमत्ता कर भरला. यामुळे उपस्थित अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश गेला.
यावेळी बोलताना डॉ. चौधरी म्हणाले की, “महापालिकेकडून सुविधा मिळण्याची अपेक्षा करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र त्या सुविधा सक्षमपणे देण्यासाठी आवश्यक असलेला मालमत्ता कर वेळेत भरणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या या करातून शहरातील विकासकामांना गती मिळते. त्यामुळे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम मी माझे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला.”
डॉ. चौधरी यांनी आपल्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण तसेच पक्षातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी त्यांनी जळगावकरांनाही आवाहन केले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत अथवा आगाऊ भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळेल आणि जळगाव अधिक सक्षम व सुस्थित शहर म्हणून विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रमाणपत्र स्वीकारताना आणि मालमत्ता कर भरताना भाजप गटनेते प्रकाश बालानी, मनोज काळे, नितीन बर्डे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
