स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुटका; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
साईमत/ पुणे
पुणे शहरात महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, पर्वती पायथा परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाने स्वतःच्या नऊ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, शेजाऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पीडित मुलीचा सख्खा आजोबा आहे. त्याने मुलीला घरात एकटे गाठून माळ्यावर बोलावले आणि तिचे कपडे काढून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारील महिला आणि काही नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यांनी खोलीत प्रवेश करून मुलीची सुटका केली आणि नराधम आजोबाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलीस कारवाई आणि कलमे : घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस ठाण्याचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर ‘पॉक्सो’ (POCSO) कायदा कलम ६, १० आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ६४ व ६६ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक अत्याचार होण्यापूर्वीच तिची सुटका करण्यात आली, मात्र आरोपीचा हेतू अत्यंत गंभीर होता.
पालकांचा संताप: ‘फाशीच द्या’ : “आरोपी माझा सासरा असला तरी त्याने केलेले कृत्य माफीच्या पलीकडे आहे, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी दिली. तर, “मी कामावरून परतल्यावर हा प्रकार समजला, माझ्या मुलीला त्याने मारण्याची धमकी दिली होती,” असे सांगत मुलीच्या मातेनेही आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचा रोष आणि प्रशासनाची भूमिका : घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी नागरिकांना शांत केले आणि निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले. या प्रकरणावर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला असून, अशा घटना रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर समुपदेशनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
