गर्दीचा गैरफायदा; बसस्थानकात महिलेचे मंगळसूत्र लंपास
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी :
शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकारामुळे बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९, रा. काकळणे, ता. चाळीसगाव) या मंगळवारी (दि. २१ एप्रिल) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्या पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, तेथील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र लंपास केले.
चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत चोरटा गर्दीत मिसळून पसार झाला होता. या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव करत आहेत.
दरम्यान, बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
