उजव्या कालव्याजवळ आढळला गळा चिरलेला मृतदेह
साईमत चोपडा प्रतिनिधी :
शहरातील नारायण नगर परिसरालगत असलेल्या हातनूरच्या उजव्या कालव्याजवळ आज सकाळी एका युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप राजू माळी असे मृत युवकाचे नाव असून, त्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आज सकाळी स्थानिक नागरिकांना कालव्याच्या काठावर संशयास्पद अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची स्थिती पाहता हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांनी तातडीने मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. मात्र, नातेवाईकांनी अधिक सखोल तपासासाठी फॉरेन्सिक तपासणीची मागणी केल्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी जळगाव येथे पाठवण्यात आला.
या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांची चौकशीही सुरू आहे. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचे वातावरण अधिक गडद झाले असून नागरिकांकडून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. पोलिसांच्या तपासाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
