पोलीस ठाण्यात कोयत्याचा धुडगूस; अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण अटकेत
साईमत एरंडोल प्रतिनिधी :
एरंडोल येथे पोलीस ठाण्यात घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या ओळखीच्या संशयितांना अटक का करण्यात आली नाही, या कारणावरून संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट पोलीस ठाण्यात घुसून हातात कोयता घेत गोंधळ घालत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एरंडोल पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना समाधान राधो अहिरे (वय ३२, रा. केवडपुरा, एरंडोल) हा तरुण हातात धारदार कोयता घेऊन अचानक पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे “वरील आरोपींना अटक का केली नाही” असा जाब विचारत जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली. संतापलेल्या या तरुणाने हातातील कोयत्याने पोलीस ठाण्यातील भिंतीवरील टीव्हीवर वार करत नुकसान केले. या हल्ल्यात टीव्हीची वायर तुटून तो बंद पडला. एवढ्यावरच न थांबता त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मॉनिटरवरही कोयत्याने वार करून त्याचेही नुकसान केले.
या दरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण करत, समाधान अहिरे याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी मुकेश आमले यांच्या अंगावर कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर पोलीस कर्मचारी दिनेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाधान अहिरे याच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
