साईमत / उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी पहाटे सुमारे ४:३० वाजता घडली. आरोपी पित्याने आपल्या ११ वर्षांच्या जुळ्या मुलींचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती यूपी-112 वरून पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरात प्रवेश करताच दोन्ही मुलींचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून सर्वजण हादरून गेले.
यानंतर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, दोन्ही मुलींच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट दिसून येते.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पित्याला ताब्यात घेतले असून अटक करण्यात आली आहे. मात्र या क्रूर हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध शक्यतांचा तपास करत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कानपूरमध्ये संतापाची लाट उसळली असून संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
