साईमत / जळगांव
राज्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण घोषणा करत येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर दौऱ्यात दिली.
यासोबतच, एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असून त्यामुळे एसटी सेवेत लक्षणीय वाढ होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे. आता कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम पाळला नाही तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणीदरम्यान काही त्रुटीही समोर आल्या. कॅन्टीनमध्ये दरफलक झाकण्याचा प्रकार आढळल्याने मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच स्वच्छतागृहात जादा शुल्क आकारल्याच्या तक्रारींवरून संबंधित कंत्राटदारालाही जाब विचारण्यात आला.
अचानक भेटीदरम्यान स्वच्छतेबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत, “मी येणार होतो म्हणूनच इतकी स्वच्छता केली का?” असा सवाल केला. या पाहणीनंतर प्रवाशांच्या सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
