सार्वजनिक जागेच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सासू-सुनेवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार
साईमत जळगाव प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद कधी हिंसक वळण घेतो, याचे धक्कादायक उदाहरण जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेवर कुंपण घालण्यावरून झालेल्या वादातून एका ६२ वर्षीय वृद्ध महिला आणि त्यांच्या सुनेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलबाई गोपीचंद सपकाळे (वय ६२, रा. नांद्रा खुर्द) यांनी आरोपी सचिन ज्ञानेश्वर सोनवणे याला ग्रामपंचायतीच्या येण्या-जाण्याच्या सार्वजनिक जागेवर कुंपण घालण्यास मज्जाव केला होता. “येथे कुंपण घालू नको,” असे स्पष्ट सांगितल्यामुळे आरोपीच्या मनात संताप साचला.
कुऱ्हाडीने थेट हल्ला
या वादाचा राग मनात धरून आरोपी सचिन सोनवणे याने संतापाच्या भरात मंगलबाई यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर कुऱ्हाडीचा जोरदार वार करत त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, हा वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या सून मनिषा यांच्यावरही कुऱ्हाडीच्या दांडक्याने डोक्यावर प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात दोघींनाही गंभीर दुखापत झाली आहे.
हल्ल्यानंतर आरोपीने पीडित महिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, “पुन्हा माझ्या रस्त्यात आलात, तर एकेकाला उडवून टाकीन,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
परिसरात खळबळ; पोलिसांत गुन्हा
या घटनेमुळे नांद्रा खुर्द परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मंगलबाई सपकाळे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(९), ११५(२), ३५१(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार नरेंद्र पाटील करीत असून, आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
