शासनाच्या आरोग्य योजनांअंतर्गत गंभीर आजारांवरील उपचारासाठी मोठा दिलासा; राज्यभरात ४० हजारांहून अधिक रुग्णांना लाभ
साईमत / जळगांव
शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा मोठा आधार ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात या आर्थिक वर्षात तब्बल १६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून या योजनेत जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया तसेच अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मदत वितरण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली आहे.
या योजनेत सामंजस्य करार, क्राउड फंडिंग तसेच धर्मादाय रुग्णालये आणि विविध संस्थांच्या सहकार्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. परिणामी, पात्र रुग्णांपर्यंत वेळेत आर्थिक सहाय्य पोहोचत आहे.
या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, डायालिसिस, अपघात, नवजात शिशुंचे आजार, भाजणे, विद्युत अपघात यांसह एकूण २० गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून, CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार आहे.
आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरात ४०,७७६ रुग्णांना सुमारे ३३३ कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. तर जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३ कोटी ३३ लाखांहून अधिक आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
