जळगावात महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; संच वाटप केंद्रावर रंगेहात पकड
साईमत जळगाव प्रतिनिधी
लहानशी वाटणारी १०० रुपयांची लाच अखेर मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश ठरली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत मिळणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या संचासाठी ‘केवायसी’ करण्याच्या नावाखाली लाच स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईत टेबलाखालून तब्बल ४१ हजार २५० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून बांधकाम मजुरांना गृह उपयोगी वस्तूंचे संच वाटप केले जातात. यासाठी तक्रारदाराने ९ एप्रिल रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर १५ एप्रिल रोजी चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील केंद्रावर संच घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते.
यावेळी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजीनगर) या महिला कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडे १०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
त्यानुसार, एसीबीने १५ एप्रिल रोजी चिंचोली येथील संच वाटप केंद्रावर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १०० रुपये स्वीकारताना आसमा शेख यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान अधिक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी महिला ज्या टेबलावर बसत होती, त्या टेबलाखालील पत्रपेटीत ४१ हजार २५० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम इतर लाभार्थ्यांकडून ‘केवायसी’च्या नावाखाली घेतलेल्या लाचेची असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, ती जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शासनाच्या योजनांमध्ये लाचखोरीचे सावट पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, लाभार्थ्यांकडून होणाऱ्या शोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
