साईमत / जळगाव
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाचा पारा सलग काही दिवसांपासून ४२ अंश सेल्सिअसच्या वर स्थिर आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच उन्हाने तीव्र रूप धारण केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते पूर्णपणे ओस पडत असून जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मागील २४ तासांत कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून किमान तापमान २४.३ अंशांवर स्थिर आहे. त्यामुळे रात्रीसुद्धा उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. ते ४१ ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे रुग्णालयांमध्ये उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे आणि निर्जलीकरणाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि उष्णतेपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
