साईमत / जळगांव
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जळगावमधील सराफ बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार वाढ नोंदवली. या अचानक बदलामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यामुळे सोने-चांदीला पुन्हा तेजी मिळाली आहे. यापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला होता, ज्याचा परिणाम म्हणून दरात घसरण झाली होती. मात्र आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे.
आज मंगळवारी सकाळी बाजार उघडताच जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात १,४४२ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे जीएसटीसह प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर १,५६,६६३ रुपयांवर पोहोचला. याआधी सोमवारी ३०९ रुपयांची घसरण होऊन दर १,५५,२२१ रुपयांपर्यंत खाली आला होता.
चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी चांदीच्या दरात तब्बल ८,२४० रुपयांची वाढ होऊन प्रति किलो दर २,५८,५३० रुपयांपर्यंत गेला. सोमवारी मात्र ५,१५० रुपयांची घट होऊन दर २,५०,२९० रुपयांवर आला होता.
दरातील या अचानक बदलामुळे बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असून ग्राहक खरेदीबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
