शहरात बिबट्याचा धुमाकूळ पोलीस-वनविभाग सतर्क
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण मुक्ताईनगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळपासूनच विविध भागांत बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या व अफवा वाऱ्यासारख्या पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले आहे. काही भागांत त्याच्या हालचालींचे ठसे आणि संकेतही आढळून आले आहेत. ही माहिती समोर येताच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून, बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालक अधिक सतर्क झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी वनविभाग व पोलीस प्रशासनाला त्वरित कारवाईचे आदेश देत बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्याच्या सूचना दिल्या. येत्या काही तासांत बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पोलीस व वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक गर्दी टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. भीतीचे वातावरण असले तरी लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
