हृदयद्रावक घटना; आजोबांच्या संशयामुळे उघडकीस आले थरारक सत्य
साईमत / पुणे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी परिसरात 6 वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने आईने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच मुलाची हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
27 वर्षीय बसरिन शेख हिचे विनायक कजेवाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार महिन्यांपासून दोघेही कुरुळी येथे एकत्र राहत होते. मात्र बसरिनचा 6 वर्षांचा मुलगा आवेज हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याचे मानले जात होते. याच कारणातून 4 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजता आईने प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने मुलाचा जीव घेतला. प्रथम मुलाचे डोके पाण्याच्या बादलीत बुडवण्यात आले आणि नंतर भिंतीवर तसेच जमिनीवर जोरात आपटण्यात आले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना नैसर्गिक मृत्यू भासवण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचण्यात आला.
पुरावा नष्ट करण्यासाठी बसरिन शेख मुलाचा मृतदेह घेऊन बीड येथे माहेरी गेली आणि नातेवाईकांना मुलाचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे सांगितले. अंत्यविधीची तयारी सुरू असताना मुलाच्या आजोबांना मृतदेहावरील खुणांमुळे संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास सुरू करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, आवेजचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आईला अटक केली असून तिचा प्रियकर राम अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून समाजमन हादरले आहे.
