शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन वाटप सुरू असल्याची चुकीची माहिती पसरल्याने गोंधळ पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात
साईमत भडगाव प्रतिनिधी
शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन मिळणार असल्याच्या अफवेने भडगाव शहरात सोमवारी सकाळपासूनच मोठी खळबळ उडाली. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आदेश नसतानाही शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रावर धाव घेतल्याने परिसरात प्रचंड गर्दी उसळली. काही वेळातच केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शेतकरी संघाकडून टोकन वाटप सुरू झाल्याची चुकीची माहिती ग्रामीण भागात वेगाने पसरली. परिणामी, आपल्या धान्याच्या विक्रीच्या आशेने अनेक शेतकरी सकाळपासूनच केंद्रावर दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही टोकन प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पसरले.
गर्दी वाढत गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या पथकासह परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी संघाच्या संचालक मंडळाशी संवाद साधला आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला.
पोलिसांनी संयमाने शेतकऱ्यांना समजावून सांगत कोणतीही अधिकृत प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शांतता राखण्याचे आवाहन करत सर्व शेतकऱ्यांना हळूहळू सुरक्षितपणे परत जाण्यास सांगितले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, टोकन वाटपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. योग्य नियोजन आणि प्रशासकीय मान्यतेनंतरच अधिकृत सूचना जाहीर केली जाईल आणि त्यानुसारच पुढील टोकन वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकारामुळे ग्रामीण भागात अफवांवर विश्वास ठेवून होणारी गर्दी आणि निर्माण होणारा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला असून, प्रशासनाकडून अधिकृत माहितीच स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
