जेसीबीसमोर आदिवासींचा ठिय्या; महापालिकेला माघार घ्यावी लागली
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
शहरालगतच्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरात मंगळवार, ७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. गेल्या वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी अचानक सुरू झालेल्या कारवाईला तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरल्याने परिसर काही काळ रणांगणात परिवर्तित झाला होता. प्रशासन आणि नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण चिघळले होते.
महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या एकलव्य नगर झोपडपट्टी हटवण्यासाठी प्रशासनाने तीन जेसीबींसह पथक पाठवले होते. मात्र, कारवाईची माहिती मिळताच महिलांसह शेकडो आदिवासी बांधव घटनास्थळी एकत्र जमले. “आम्ही दोन दशकांपासून येथे राहत आहोत, आमच्या डोक्यावर छप्पर आहे तेही हिरावून घेणार का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी पथकाला रोखले.
आंदोलकांनी “पर्यायी जागा द्या, मगच आम्ही हटू” अशी ठाम भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महापालिका कर्मचारी आणि आदिवासी बांधव यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. काही वेळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आंदोलकांनी प्रशासनासमोर स्पष्ट मागणी मांडली की, “प्रचलित कायद्यानुसार आम्हाला हक्काची जागा द्यावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी. अन्यथा आम्ही येथून हलणार नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे कारवाई थांबवावी लागली.
परिस्थिती बिघडत चालल्याचे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अखेर नरमाईची भूमिका घेतली. झोपड्या न पाडता केवळ परिसरातील झाडाझुडपांची सफाई करून पथकाने माघार घेतली. यावेळी सहायक उपायुक्त उदय पाटील यांनी मध्यस्थी करत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, “हक्काचा निवारा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील” असा इशारा देत त्यांनी पुढील निर्णय बैठकीनंतर घेणार असल्याचे स्पष्ट केले.
