शेतकऱ्याचे ५० क्विंटल मका नष्ट ५० हजारांचे नुकसान ग्रामस्थांची तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी
साईमत /जामनेर/फत्तेपूर / प्रतिनिधी
जळोद्री शिवारात वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे २ एकर मका शेत जळून खाक झाले आहे. या घटनेत भारत सुपडू सुरवाडे (वय ५५) यांच्या कुटुंबाचे अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
तालुक्यातील जळोद्री येथील गट क्रमांक १४ मधील शेतात रविवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मका कापणीचे काम सुरू होते. या वेळी शेतावरून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन घर्षण झाले आणि त्यातून निघालेली आगीची ठिणगी सुक्या मका पिकावर पडली.
उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे आग काही वेळातच रौद्र रूप धारण करीत दोन एकर शेताला झपाट्याने बळी बनवले. सुमारे ५० क्विंटल मका जळून खाक झाल्याने मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुरवाडे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
या घटनेची नोंद फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये ‘अकस्मात आग’ म्हणून करण्यात आली आहे. घटनेची चौकशी सपोनि अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचितानंद अहिरे करत आहेत. परिसरातील ग्रामस्थांचा म्हणणं आहे की, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ही आग लागली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी.
या घटनेने फत्तेपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वीज संरचनेच्या कमजोर व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी निर्माण केली आहे. ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
