प्रवाशांना दिलासा! रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू
साईमत भुसावळ प्रतिनिधी:
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या कामांमुळे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या महत्त्वाच्या गाड्या पुन्हा आपल्या वेळापत्रकानुसार धावू लागल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आता हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्र. १८०३०) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस (गाडी क्र. १८०२९) यांचा समावेश आहे. ४ ते २४ एप्रिल दरम्यान रद्द असलेल्या गाडी क्र. १८०३० शालिमारहून नियोजित वेळेनुसार पुन्हा धावणार आहे. त्याचप्रमाणे ६ ते २६ एप्रिल दरम्यान रद्द असलेली गाडी क्र. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनसहून शालिमारकडे पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. १२१०१) ही ४, ५, ७, ८, ११, १२, १४, १५, १८, १९, २१ व २२ एप्रिल रोजी प्रवाशांना सेवा देणार आहे. तसेच, शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. १२१०२) ही ६, ७, ९, १०, १३, १४, १६, १७, २०, २१, २३ व २४ एप्रिल रोजी नियोजित वेळेनुसार धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी गाड्यांची अद्ययावत माहिती अधिकृत चौकशी क्र. १३९, ‘रेलवन’ ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासावी.
या निर्णयामुळे नागपूर विभागातील प्रवाशांना वेळेवर आणि सुरळीत प्रवासाची खात्री मिळाली असून, रद्द गाड्यांमुळे झालेल्या गैरसोयीची भरपाई करण्यात आली आहे.
