उखडलेल्या रस्त्याने नागरिकांचे हाल, ठेकेदारावर संताप
साईमत भुसावळ प्रतिनिधी:
भुसावळ ते मधुकर सहकारी साखर कारखाना दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला अचानक ब्रेक लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वेगात सुरू असलेले हे काम मार्चमध्ये पाडळसा-भोरटेक फाट्यावर आयोजित शिवमहापुराण कथेमुळे थांबवण्यात आले. मात्र कथा संपून पंधरा दिवस उलटूनही काम पुन्हा सुरू न झाल्याने वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
तापी पूल ते पाडळसा दरम्यान सुमारे चार किलोमीटर रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आला असला तरी बामणोद ते पाडळसा या चार किलोमीटर पट्ट्यात ठेकेदाराने रस्ता खोदून मुरूम व माती टाकून तो अर्धवट अवस्थेत सोडला आहे. परिणामी, रस्त्यावर पाणी टाकल्यानंतर खवले निर्माण झाले असून वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहनचालकांना पाठदुखी व मानेच्या त्रासांच्या तक्रारी वाढत असल्याचे समोर येत आहे.
या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर चारचाकी, दुचाकी व प्रवासी वाहतूक सुरू असते. मात्र सध्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने धूळ, खड्डे आणि उखडलेला रस्ता यामुळे वाहनधारकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून वाहनांचे नुकसानही वाढले आहे. धुळीच्या ढगांमुळे समोरचे दिसत नसल्याने घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
दरम्यान, रस्त्याच्या एका बाजूला केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. नागरिकांनी वारंवार प्रशासन व संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
शिवमहापुराण कथेसाठी ज्या पद्धतीने प्रशासनाने नियोजनबद्ध बैठका घेतल्या, त्याच धर्तीवर आता रस्ता दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यास संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
याशिवाय, बामणोद ते न्हावी मार्गावरील कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
एकूणच, विकासाच्या नावाखाली सुरू असलेले हे काम सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठेकेदाराकडून अपूर्ण काम पूर्ण करून घ्यावे, अशी जोरदार मागणी वाहनधारक, व्यापारी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
