एकाच दोरीवर गळफास घेत दुहेरी आत्महत्येची घटना
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी:
चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात एका शेतकरी दांपत्याने आपले जीवन संपवले, अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) या दांपत्याने घराजवळील आपल्या शेतात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मृत्यू स्वीकारला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर तांडा येथील जाधव दांपत्याने घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असलेल्या शेतातील उंबराच्या झाडाला दोरी बांधून हा टोकाचा निर्णय घेतला. शेतातच ही घटना घडली असली तरी, स्थानिकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मृत जाधव दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. सदर घटनेच्या वेळी दोन्ही मुले शिक्षणासाठी गावाबाहेर असल्याने घरात नव्हती. ऐन उमेदीच्या काळात आई-वडिलांनी अशी दुखद घटना घडवली असल्याने या मुलांवर मानसिक आणि भावनिक धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अकस्मात मृत्यू नोंदवला. दोघांनी का टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
संपूर्ण शिवापूर शिवारात या दुर्दैवी घटनेमुळे शोक आणि स्तब्धतेचे वातावरण पसरले असून, गावकऱ्यांनी जाधव कुटुंबाला सांत्वन देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
