गप्पांच्या मैफलीत घडली शोकांतिका कट्ट्याने घेतला बळी
साईमत अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गावठी कट्टा हाताळताना झालेल्या मिसफायरमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरात मंडप व्यवसाय करणारा अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याबाबत माहिती देत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी थेट अरुणच्या छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर उपस्थित मित्रांनी तत्काळ अरुणला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी भूषण महाजन याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा कसा आला, तो कुठून मिळवला, तसेच घटनेपूर्वी मित्रांमध्ये काही वाद झाला होता का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे अवैध शस्त्रसाठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
