वाघूर पुलावर तीन ट्रक जप्त वाळू वाहतुकीवर पोलिसांचा जोर
साईमत भुसावळ प्रतिनिधी :
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी भुसावळ तालुक्यात मंगळवार, दि. २४ रोजी कडक नाकाबंदी राबविण्यात आली. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार या विशेष कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांची तपासणी केली आणि संशयित वाहने रोखली.
नाकाबंदी दरम्यान सुनसगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर MH-19 Z-0932 क्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रक आढळला. चालक अनिल सुपडू सोनवणे (वय २४, रा. बांभोरी) याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. त्यानंतर UP-53 GT-1171 क्रमांकाचा डंपरही तपासण्यात आला, ज्याचे चालक आकाश सुरेश पारधी (वय २५, रा. धानोरा) असून त्याच्याकडेही वैध परवाना नव्हता. या दोन्ही वाहनांचे मालक निशीकांत कैलास पाटील (रा. शिवकॉलनी, जळगाव) व विजय आत्माराम सपकाळे (रा. जावईनगर, बांभोरी) यांनीही कागदपत्रे सादर केली नाहीत. संबंधित ट्रक व डंपर तहसीलदार, भुसावळ यांच्या ताब्यात तपासासाठी जप्त करण्यात आले.
याच रात्रगस्ती दरम्यान बोदवड पोलीस स्टेशन हद्दीत MH-46 CL-6304 क्रमांकाचा आणखी एक ट्रक आढळून आला. चालक गणेश रघुनाथ भोई (वय २४, रा. जळका) याच्याकडेही वैध परवाना नव्हता. या ट्रकमधून गौणखनिज (वाळू) वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले, आणि वाहन तहसीलदार, बोदवड यांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यात पोलिसांची कडक नजर असल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.
भुसावळ पोलीसांनी स्पष्ट केले की, अवैध गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या नाकाबंदी व विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यास मोठा हातभार लागणार आहे.
