७९ हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त, साकरीत सापळा
साईमत भुसावळ प्रतिनिधी
तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाबुराव माळी (वय ३५, रा. सिध्देश्वर नगर, वरणगाव) हा अॅक्टिव्हावर क्र. एम.एच.१९ डी.डी.६९१२ वरून भुसावळकडून साकरीकडे अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलिस पथकाने साकरी गावाजवळ सापळा रचला.
सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन आल्यावर पोलिसांनी थांबवून तपासणी केली. तपासणीत अॅक्टिव्हावर ठेवलेल्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात दारू सापडली. आरोपीकडे दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या कारवाईत एकूण ७९,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संकेत झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, योगेश माळी याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस कर्मचारी रमन सुरळकर, योगेश पालवे, अविनाश टहाकळे आणि किरण तायडे यांनी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
