नग्न करून खांब्याला बांधून मारहाण, पत्नीचे अपहरण ५ आरोपी अटकेत गंभीर जखमी तरुण रुग्णालयात जिल्हाभरात संतापाची लाट
साईमत भुसावळ प्रतिनिधी
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणावर अमानुष अत्याचार करून त्याला नग्न अवस्थेत खांब्याला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. याच वेळी संबंधित तरुणाच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची संतापजनक बाब समोर आली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका) याने शिरपूर कन्हाळा येथील एका तरुणीसोबत १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील पंचवटी परिसरात प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली. १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून विवाहाची नोंद दिली होती. त्यानंतर दोघे चेतनच्या मामाच्या घरी मुक्कामी होते.
दरम्यान, २० मार्च रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुलीचे नातेवाईक मनोज पाटील, रूपाली उर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील यांच्यासह १० ते १२ जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यांनी नवविवाहित तरुणीला मारहाण करत तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेले.
यानंतर आरोपींनी चेतन जंगले याला घरातच बेदम मारहाण केली. रुमालाने गळा आवळून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याला घराबाहेर ओढत नेऊन खांब्याला बांधून नग्न करण्यात आले आणि लोखंडी रॉड व दगडाने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. “मुलीला सोडून दे” असा जबरदस्ती कबुलीजबाब घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपींनी त्याला मोटारसायकलवरून खडका येथे नेले आणि घरापर्यंत मारहाण सुरूच ठेवली. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी त्याच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ व मारहाण करत घर जाळण्याची धमकी दिली. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून चेतनची सुटका केली.गंभीर जखमी अवस्थेत चेतन याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पुढील तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) व संजय सोनू बढे (६१) या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.प्रेमविवाहाच्या कारणावरून घडलेल्या या अमानुष घटनेमुळे भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
