९-मजली प्रशासकीय इमारत प्रकल्प कागदावरच
साईमत/ भुसावळ / प्रतिनिधी
शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वे स्टेशनजवळील पालिकेची कोट्यवधी रुपये किमतीची जागा सध्या कचऱ्याच्या डेपोमध्ये परिवर्तित झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी एकेकाळी प्रशासकीय कामकाजाचे केंद्र असलेली ही जागा आज नागरिक आणि प्रवाशांसाठी अस्वच्छतेचे प्रमुख ठिकाण बनली असून तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पालिका प्रशासनाकडून मॉडर्न रोडसह परिसरातून गोळा होणारा कचरा या ठिकाणी टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय काही दुकानदार आणि फेरीविक्रेतेही येथेच कचरा फेकत असल्याने परिसराचा अंदाज उकिरड्यासारखा झाला आहे. दुर्गंधी, डासांचा वाढ आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, या जागेवर भव्य ९-मजली प्रशासकीय इमारत उभारण्याचे प्रकल्प माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आले होते. तळमजल्यावर व्यापारी गाळे, आतल्या भागात पार्किंग व्यवस्था, चार लिफ्ट आणि दोन जिने, प्रत्येक मजल्यावर पालिकेचे स्वतंत्र विभाग, प्रशस्त दालन व सुसज्ज बैठक हॉल अशा सर्वसमावेशक सुविधांसह आधुनिक इमारत उभारण्याचा आराखडा आखण्यात आला होता. हा प्रकल्प शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.
परंतु प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू न झाल्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या एवढ्या मौल्यवान जागेची दुरावस्था होत असताना पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागेला तातडीने कुंपण घालून कचरा टाकण्यास बंदी घालावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि प्रलंबित इमारत प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विकासाच्या गप्पांमध्ये अडकलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रत्यक्षात सुरूवात कधी होईल, की कोट्यवधींची ही जागा अस्वच्छतेच्या गर्तेतच राहणार, असा सवाल शहरवासी उपस्थित करत आहेत.
