पाडळसे कथास्थळावर प्रशासनाच्या सूचना फेटाळ भाविकांची सुरक्षितता धोक्यात
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी
यावल तालुक्यातील पाडळसे (अकलूद शिवार) येथे सुरू असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथानाट्य दररोज हजारो भाविकांना आकर्षित करत आहे. तथापि, कथास्थळाच्या सुरक्षेसंदर्भातील नियोजनात आयोजकांकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत तापी नदीकाठी सुरक्षा वाढीसाठी ग्रीन शेडनेट लावण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच, नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्याचे व महामार्गावरील उड्डाण पूलाजवळ दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही दिले गेले होते.
मात्र, आयोजकांकडून या आदेशांचे पालन न केल्यामुळे अनेक भाविक अकलूद शिवारातील पूर्व भागातील तापी नदीपात्रात उतरून अंघोळ करताना दिसले, तर काही व्यक्ती नदीकाठी शौच करताना आढळले. बॅरिकेट्स न लावल्यामुळे भाविकांची सुरक्षा धोक्यात आली असून, प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित केल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. येत्या काळात सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
