शहरात मालमत्ता कर व नळपट्टी थकीतदारांविरोधात धडक कारवाई
साईमत/पारोळा/ प्रतिनिधी
नगरपरिषदेने शहरातील थकीतदारांवर कडक कारवाई करत मालमत्ता कर आणि नळपट्टी वसुलीला गती आणली आहे. गुरुवार दि. १२ रोजी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक संजय गिते यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाने कुरेशी मोहल्ला आणि सिद्धार्थ नगर परिसरातील १३ नळ कनेक्शन थांबवले.
नगरपरिषदेने यापूर्वी संबंधित थकबाकीदारांना बिले, जप्तीपूर्व सूचना तसेच अनेक तोंडी व लेखी नोटिसा दिल्या होत्या. मात्र, थकीत रकमेचा भरणा न केल्यामुळे प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली.
मुख्याधिकारी नेरकर यांनी सांगितले की, कर वसुलीस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नगरपरिषदेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून सध्या ७ वसुली पथके सक्रिय आहेत. ही पथके थकबाकीदारांवर लक्ष ठेवून सातत्याने कारवाई करतील. थकीतदारांनी लवकरात लवकर कर भरणा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोहिमेत आस्थापना चे अनिल तिदमे, लेखापरीक्षक दिपक महाजन, सार्थक मोरस्कर, पाणीपुरवठा अभियंता संकेत कार्ले, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, वसुली लिपिक विशाल गायकवाड, विश्वास पाटील, कैलास वानखेडे, शुभम कंखरे, भुषण महाजन, राहुल पाटील यांसह इतर कर्मचारी सहभागी होते.
नगरपरिषदेची ही धडक कारवाई शहरातील करप्रणाली सुधारण्यास आणि सार्वजनिक सुविधांचा नियमित संचालन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची पावले मानली जात आहेत. नागरिकांनी यास सहकार्य करणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील टप्प्यात कडक कारवाई होऊ शकते.
