साईमत मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2026) उद्या (दि. ५ मार्च) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील एकूण सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मुख्य गटांमध्ये रणनीती जोरात सुरु आहे.
महायुतीकडून भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांचा समावेश आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा असून, या पक्षांनी सायंकाळपर्यंत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी विशेष पेच निर्माण झाला होता. शिवसेना या जागेसाठी आग्रही होती, तर काँग्रेसने देखील आपल्या दाव्याची मागणी केली होती. अखेर या तिढ्याचा तोडगा निघाला असून, काँग्रेस हायकमांडने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवारांना पाठिंबा देण्याचे निर्देश राज्यातील नेत्यांना दिले आहेत.
या निर्णयाची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, “दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला होता. त्यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्यसभेसाठी आमचा पाठिंबा शरद पवारांना असेल.”
शिवसेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, काल (मंगळवारी) रात्री राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी भेटले. या भेटीत त्यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना कोणता निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे, “काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे! महाविकास आघाडी एक आहे, एकत्र राहील! जय महाराष्ट्र!”
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता भाजपच्या चार उमेदवारांसह सर्व पक्षांची अंतिम रणनीती स्पष्ट झाली आहे. उद्या (दि. ५ मार्च) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, या निवडणुकीचे निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
