साईमत मुंबई प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींनी मुंबईतील वरळी डोम परिसर आज अक्षरशः भारावून गेला. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आयोजित करण्यात आलेली शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सभागृहात जमलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या आठवणींनी वातावरण काही काळ स्तब्ध झाले होते.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी सरन्यायाधीश भुषण गवई, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार तसेच पवार कुटुंबीय आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय भेद विसरून सर्वांनी एकत्र येत दादांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
‘जनतेचा नेता’ – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “अशी वेळ येईल, याची कल्पनाही नव्हती. आज आपण अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी ‘जनतेचा नेता’ अशी ओळख निर्माण केली होती.”
राज्याच्या कानाकोपऱ्याची अचूक माहिती आणि प्रशासकीय कौशल्य यांचा उल्लेख करत त्यांनी दादांच्या कार्याचा गौरव केला.
‘काळाचा संकेत ओळखता आला नाही’ – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक शब्दांत आठवणींना उजाळा दिला. “१९९१ पासून त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. ते स्पष्टवक्ते आणि परखड होते. आम्ही तिघे (फडणवीस, अजितदादा आणि मी) एकमेकांच्या मनातील गोष्टी सहज ओळखत होतो. आमचे बॉन्डिंग घट्ट होते; पण काळाचा संकेत ओळखता आला नाही,” असे सांगताना त्यांचा आवाज दाटून आला.
‘इतक्या मोठ्या संख्येने जमलेली मंडळी हीच खरी श्रद्धांजली’ – प्रफुल पटेल
प्रफुल पटेल म्हणाले, “दादांच्या शोकसभेला अशा प्रकारे एकत्र यावे लागेल, असे वाटले नव्हते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील लाखो लोकांनी अश्रू ढाळले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची यातूनच दिसून येते.”
आज उपस्थित असलेली मोठी गर्दी हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.
भुजबळ भावूक; ‘अवेळी का निघून गेले?’
छगन भुजबळ यांनीही अत्यंत गहिवरून श्रद्धांजली अर्पण केली. “अनेक शोकसभांना गेलो; पण दादांच्या शोकसभेला उपस्थित राहावे लागेल, असे वाटले नव्हते. ज्या वयात ते आपल्यातून गेले, तो मोठा धक्का आहे. वेळेवर पोहोचणारे दादा आज मात्र अवेळी का निघून गेले?” असा प्रश्न उपस्थित करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ – जयंत पाटील
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात हिंदी गीताच्या ओळी म्हणत वातावरण अधिक भावूक केले – “चिठ्ठी ना कोई संदेश…” ते पुढे म्हणाले, “सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करणारा नेता क्वचितच पाहायला मिळतो. बारामतीसारखा विकास पाहायचा असेल, तर दादांचे काम पाहावे.”
शेवटी “इक आह भरी होगी… जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…” या ओळी उच्चारत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
नाना पाटेकर यांची हळवी आठवण
अभिनेते नाना पाटेकर यांनी पन्नास वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण सांगितली. “आज इतकी मंडळी येथे जमली आहेत; पण हीच मंडळी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जमली असती, तर अधिक समाधान वाटले असते,” असे म्हणताना त्यांचेही डोळे पाणावले.
राजकारणात निर्माण झालेली पोकळी
अजितदादांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वारंवार उल्लेख करत सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वरळी डोममध्ये पार पडलेली ही सभा केवळ शोकसभा नव्हती; ती एका धडाडीच्या, कर्तृत्ववान आणि जनतेच्या नेत्याला वाहिलेली सामूहिक आदरांजली होती.
