रॉंग साईडचा जीवघेणा खेळ एक ठार – दोन गंभीर जखमी
साईमत/मुक्ताईनगर /प्रतिनिधी:
मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील हॉटेल महिंद्रा फाट्याजवळील हनुमान मंदिरासमोर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा कारने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एमपी ६३ झेडए ६७२५ क्रमांकाची दुचाकी चुकीच्या बाजूने (रॉंग साईडने) येत होती. या दुचाकीवर तिघेजण स्वार होते. त्याच वेळी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे येणारी एमएच ४१ सी ५२९० क्रमांकाची इनोवा कार भरधाव वेगात समोरून आली आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्ते तुषार बोरसे यांनी घटनेची माहिती मिळताच विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृताची ओळख पटवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
उर्वरित दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
या अपघाताप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताचे नेमके कारण व जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. रॉंग साईडने वाहन चालवण्याची बेफिकीरी आणि भरधाव वेग यांचा संगनमताने पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी घेतल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
