नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.
साईमत/शेंदुर्णी /प्रतिनिधी
शेंदुर्णी शहरात नवीन बियरबार व वाइन शॉप सुरू करण्यास नगरपंचायतीकडून नाहरकत दाखले देण्यात आल्याच्या चर्चेमुळे उसळलेल्या तीव्र जनआक्रोशाला अखेर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत आणि भविष्यातही देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन नगरपंचायत प्रशासनाने दिल्यानंतर उद्या (दि. ६ फेब्रुवारी २०२६) होणारा नागरिकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नवीन वाइन शॉप व बियरबारसाठी नाहरकत दाखले देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली होती. या चर्चेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये, विशेषतः महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मद्यविक्रीमुळे शहरातील सामाजिक वातावरण बिघडेल, युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढेल आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती व्यक्त करत स्वशक्ती व्यसनमुक्ती समितीच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल आणि गटनेते अतुल बारी यांनी मोर्चा आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, मुख्याधिकारी विवेक धांडे हे कार्यालयीन कामानिमित्त मुंबई येथे असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे समितीच्या सदस्यांशी संवाद साधत वस्तुस्थिती स्पष्ट केली. चर्चेनंतर नगरपंचायतीकडून कोणत्याही नवीन बियरबार किंवा वाइन शॉपसाठी नाहरकत दाखले देण्यात आलेले नाहीत, तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या संदर्भात मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या वतीने कार्यालय अधीक्षक सोनजे यांच्या स्वाक्षरीने सुनील गुजर यांना लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाची ही ठाम आणि लेखी भूमिका समोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत मद्यविक्री नाहरकत दाखल्यांविरोधातील उद्याचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
नगरपंचायत प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वशक्ती व्यसनमुक्ती समिती तसेच शहर जागरूक नागरिक मंच, शेंदुर्णी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. शहराच्या सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांच्या एकजुटीमुळेच प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
