नववीत शिकणाऱ्या दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू
साईमत/ भुसावळ/प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील साकरी गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे.
साकरी येथील जनता विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या या दोन्ही मुली सकाळी नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला. शोधादरम्यान गावालगत असलेल्या सोपान फेगडे यांच्या शेतातील विहिरीत दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले.
ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विहिरीजवळील परिसर सुरक्षित करून पंचनामा केला असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की यामागे अन्य काही कारण दडले आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी रोहन नरेंद्र चौधरी (वय २०, रा. साकरी) या तरुणाला संशयाच्या आधारे ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे साकरी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून दोन्ही चिमुकल्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी या घटनेच्या सखोल व पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.
