काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला
साईमत/नाशिक/ प्रतिनिधी :
हातावरची मेंदी अजून ओलीच होती. डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्नं ती रंगवत होती. नववधू म्हणून बोहोल्यावर चढण्याची वेळ जवळ आली होती; पण नियतीने त्या क्षणाआधीच तिचे आयुष्य हिरावून घेतले. मंगलाष्टकांची तयारी सुरू असताना काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला.
तरुणीचा दीपशिखा या हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी पाम स्प्रिंग रिसॉर्टमध्ये घडली. रविवारी (दि. २८) सकाळी विवाहाची धावपळ सुरू असतानाच दीपशिखाला अस्वस्थ वाटू लागले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने तिचे निधन झाल्याचे सांगताना डॉक्टरांनाही गहिवरून आले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नववधूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाचा क्षण एका क्षणात दु:खात बदलल्याने ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे.
