८०० पेक्षा अधिक विवाहेच्छुकांची उपस्थिती : देश-विदेशातून समाजबांधवांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील लेवा नवयुवक संघाने रविवारी, ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या विश्वस्तरीय लेवा पाटीदार विवाहेच्छुक वधू-वर महामेळाव्यामुळे जळगावातील एकलव्य क्रीडा मैदान लेवा समाजाच्या बांधवांनी गजबजून गेले होते. अशा अभूतपूर्व मेळाव्यात विवाहेच्छुक वधू-वरांची व त्यांच्या पालकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. सुमारे आठशेहून अधिक विवाहेच्छुक वधू-वरांनी महामेळाव्यात परिचयासाठी आपली नावे नोंदवली होती. विशेष म्हणजे, देश-विदेशातूनही विवाहेच्छुक वधू-वर तसेच त्यांचे पालक याठिकाणी उपस्थित झाले होते.
समाजातील सर्व स्तरातील विवाहेच्छुक वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणून परिचय करून देण्याचा हा एक अभिनव उपक्रम लेवा नवयुवक संघाने दरवर्षीप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडला. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत, कार्यक्रमात विदेशातून ऑनलाईन पद्धतीनेही वधू-वरांना एकमेकांचा परिचय करून देण्यात आला. भव्य कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुटुंबनायक ललित रमेश पाटील, आ.एकनाथराव खडसे, डॉ. उल्हास पाटील, आ.राजू मामा भोळे, डॉ. ए. जी. भंगाळे, ह.भ.प. दादा महाराज जोशी आदींची उपस्थिती होती.
लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी आणि त्यांच्या पत्नी कीर्तीमालिनी चौधरी यांनी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला. प्रमुख पाहुण्यांनी विवाहेच्छुक वधू-वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी समायोजित शुभेच्छा दिल्या. मेळाव्यात उपस्थित असलेल्या विवाहेच्छुक वर-वधू व त्यांच्या पालकांसाठी भोजनासह अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती. तसेच, उपस्थितांना वधू-वर सूचीचे वितरणही याठिकाणी करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन नेमाडे, प्रणिता झांबरे यांनी केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, सुभाष भोळे, हितेंद्र चौधरी, जयेश भोळे, योगेश भोळे, सुनील महाजन, राजेश चौधरी, निळकंठ नारखेडे, अनिल चौधरी, भालचंद्र खडके, शामकांत भंगाळे, प्रवीण राणे, चंदन कोल्हे, गिरीश नारखेडे, दिगंबर पाटील, किरण चौधरी, रूपेश सरोदे यांच्यासह लेवा नवयुवक संघाच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. हा उपक्रम समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
