चोरीसाठी गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे उघड
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (वय ३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) या लेडी नॅचरला बरेलीतून ताब्यात घेतले. चोरी करण्याची आयडीया तिला युट्युब, क्राईम पेट्रोल, सावधान इंडियावरील व्हिडीओ बघून मिळाली तर चोरीसाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून तेथे अंगठी बघतांना हातचलाखी करीत आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या अंगठ्या चोरुन नेल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ व शनिपेठ पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच चोरी करतांना ही महिला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांकडून फुटेजच्या आधारावरुन लेडी नॅचरचा शोध शोध घेतला जात होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन ही महिला उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासधिकारी पो.हे.कॉ. प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा आणि पो.कों. निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली येथून ताब्यात घेतले. अंगठी चोरी करण्याची आयडीया या लेडी स्नॅचरला युट्यूबवरुन मिळाली आणि क्राईम पेट्रोल, सावधान इंडियायासह क्राईम स्टोरीमधील घटना वाचून ती सुमारे दहा वर्षांपासून तिने वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करीत आहे. सोन्याचे शोरुम शोधण्यासाठी गुगल मॅपचा ती वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
अनेक शोरुममध्ये गेल्यानंतर ही महिला तेथील दागिन्यांना लावलेले क्युआर कोडचे टॅग चोरी करीत होते. तसेच शोरुमच्या बाहेर फेकलेल्या कचऱ्यांमधून तिने दागिन्यांना लावले जाणारे टॅग चोरले आणि ते बनावट अंगठ्यांना लावून हातचालाखी करीत तेथून सोन्याची अंगठ्या चोरुन नेल्याचे त्या महिलेने पोलिसांना सांगितले.
