नवउद्योजकांना प्रामाणिकपणा-संयमाचे बाळकडू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवसंशोधन,नवोपक्रम व साहचर्य मंडळातर्फे (केसीआयआयएल) आयोजित तीन दिवसीय स्टार्टअप अंतर्गत विशेष कौशल्य शिबिराचा (स्टार्टअप बुटकॅम्प) प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी मंचावर जळगाव येथील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल लि.चे चेअरमन व मुख्य कार्यकारी संचालक दीपक चौधरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, केसीआयआयएलचे संचालक प्रमोद संचेती, नवसंशोधन,नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे, संचालक डॉ. राजेश जवळेकर, समन्वयक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे उपस्थित होते. शिबीरात कोल्हापूर, यवतमाळ, पुणे यासह विविध भागातून ३० नवउद्योजक सहभागी झाले होते.
याप्रसंगी दीपक चौधरी म्हणाले की, अथक परिश्रमातूनच यशस्वी उद्योजक होता येते. व्यवसायाचे नितीसूत्र प्रामाणिकपणे अवलंबल्यास यशस्वीतेकडे वाटचाल करता येते, असे सांगून त्यांनी त्यांच्या यशस्वी उद्योजकाचा प्रवास कथन केला. उद्योजक प्रमोद संचेती म्हणाले की, उद्योग व्यवसायात विविध कल्पना साकारता येवू शकतात. इतरांपेक्षा वेगळ काम करून आपला ठसा उमटवावा. भारतात स्टार्टअप करीता पोषक वातावरण आहे.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे म्हणाले की, आपल्या देशात स्टार्टअप करीता सरकारने तीन महत्वपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. भारतातील तरूण हुशार व होतकरू असल्याने स्टार्टअपमध्ये जगात भारत तीसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु स्टार्टअपचे रूपांतरण यशस्वी उद्योगात झाले पाहिजे. त्याकरीता संयम, प्रामाणिकपणा आणि व्यवसायाची नितीसूत्र अंगीकारणे आवश्यक आहे. सुरुवातीस तीन दिवसीय कार्यशाळेचा आढावा डॉ. नवीन खंडारे व डॉ. राजेश जवळेकर यांनी मांडला. शिबिरात २१ नोव्हेंबर रोजी डॉ. नवीन खंडारे, डॉ. युवराज परदेशी, श्रीकांत पाटील, उल्हास भाळे, सीए पंकज दारा व अक्षर गव्हाणे, सुनील देवधरे यांनी मार्गदर्शन केले. हे शिबीर २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केले होते. यावेळी या शिबीराकरीता योगेश पाटील व विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोशनी जैन यांनी केले.
