माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यावर ॲड.पियूष पाटील यांचा आरोप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव शहर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या प्रभागातील नावे पहिल्या प्रभागात अशा पद्धतीचे घोळ झाल्याचे बघायला मिळाले आहे. यासोबतच शहरातील दुबार नावांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या कुटुंबातील सदस्य असलेले त्यांचे बंधू सुनील भंगाळे यांचे एकाच यादी भाग क्रमांकमध्ये परंतु वेगवेगळ्या बुथवर दोन मतदान कार्ड असल्याचे समोर आलेले आहे. त्यांचे पुतणे आकाश भागवत भंगाळे यांचे शहरातील वेगवेगळ्या यादी भाग क्रमांक मध्ये ३ वेगवेगळ्या बूथवर मतदान आढळून आले आहे. यासोबतच इतर सदस्यांचेही २ वेगवेगळे मतदान कार्ड असल्याचे समोर आले आहे.
विष्णू भंगाळे यांचे अतिशय निकटवर्ती आसोदा येथील हेमंत धनंजय पाटील हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्यासह पत्नी आई-वडील यांचे आमच्या प्रभागात नाव असल्याचे समोर आलेले आहे. तसेच विष्णू भंगाळे यांच्या जवळचे मित्र पंकज बोरोले हे मूळ तरसोद याठिकाणी वास्तव्यास असताना त्यांचे त्या ठिकाणी विधानसभा मतदार यादीत नाव असताना त्यांचे मतदान हे आमच्या प्रभागात वाढवण्याचे समोर आलेले आहे. यासोबतच जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद भादली, नशिराबाद, चाळीसगाव तालुक्यातील भंगाळे यांचे मूळ गाव असलेले वाघळी येथील तीन हजार बोगस मतदार आमच्या प्रभागात समाविष्ट केले असल्याबाबतचा आरोप ॲड. पियुष पाटील यांनी केला आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून लोकशाहीसाठीही घातक आहे.याप्रकरणी आपण पुराव्यानिशी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, राज्य निवडणूक आयोग, जळगाव मनपा आयुक्त तसेच उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. तसेच संपूर्ण प्रभागांमध्ये मनपा कर्मचाऱ्यांमार्फत ‘हाऊस टू हाऊस’ सर्वे करून बोगस मतदार जे जागेवर आढळून येत नाही किंवा जे पुरावे सादर करू शकणार नाही त्यांना चिन्हांकित करण्याबाबत अर्ज करणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक होणे उचित होणार नाही, म्हणून म्हटले आहे.
विष्णू भंगाळे यांचे बंधू सुनील भंगाळे यांचे एकाच प्रभागात दोन ठिकाणी मतदान असल्याचा पुरावा. आकाश भागवत भंगाळे यांचा जळगाव शहरातील विविध यादी भाग क्रमांकमध्ये एकूण ३ ठिकाणी मतदान असल्याचा पुरावा. विष्णू भंगाळे यांचे निकटवर्तीय असोदा ग्रामपंचायत सदस्य हेमंत धनंजय पाटील यांचे जळगाव ग्रामीण मधील असोदा येथे तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराचे जळगाव शहर मनपा प्रभाग क्रमांक ५ मध्ये नावे असल्याचा पुरावा. विष्णू भंगाळे यांचे निकटवर्तीय पंकज बोरोले यांचा तरसोदा गावी मतदान असल्याबाबतचा तसेच जळगाव शहरात प्रभाग क्रमांक ५ मध्ये मतदान असल्याबाबतचा पुरावा असल्याचे ॲड.पियुष पाटील यांनी सांगितले.
