साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील नवीन बसस्थानक आवारातून खिसे कापून चोरी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी, २५ जून रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे. तिघेही आरोपी अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, पाच मोबाईल आणि इंडिका कार असा साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने गुरूवारी, २६ जून रोजी दिली.
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे खिसे कापून पैसे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. जळगाव बसस्थानक आवारात अमरावती येथील काही रेकॉर्डवरील गुन्हेगार खिसे कापणारे गुन्हेगार असल्याची गोपनिय माहिती एलसीबीच्या पथकातील पो.कॉ. प्रवीण भालेराव, अक्रम शेख यांना मिळाली होती. त्यानुसार ही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली होती.
एलसीबीच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आणि रवींद्र कापडणे यांनी बुधवारी, २५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मजिद समोर, अमरावती) अशी नावे असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांनी बसस्थानकात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यांनी केली कारवाई
आरोपींची अंगझडती आणि वाहनाची तपासणी केल्यावर पोलिसांना त्यांच्याकडून ३३ हजार ८३० रूपयांची रोकड, १७ हजार ५०० किंमतीचे पाच मोबाईल, एक रेक्झीन बॅग आणि ५ लाख रुपये किंमतीची इंडिका कार असा साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. शरद बागल, पो.हे.कॉ.सुनील दामोदरे, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पो.ना.किशोर पाटील, पो.कॉ.रवींद्र कापडणे यांनी केली आहे.