मुक्ताईनगरला खरेदी केंद्र लवकर सुरू होणार, मंत्री खडसे यांच्या प्रयत्नांना यश
साईमत।मुक्ताईनगर।प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांना विनंती केली होती. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळमार्फत शेंदुर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, एरंडोल व पारोळा अशा ११ ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)चे कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. मुक्ताईनगर येथील सीसीआय केंद्राचे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्यांतर्गत प्रत्येक तालुक्यावर कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत खडसे यांनी मागणी केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही तालुक्यावर सुरु करता येणार नाही तर मुक्ताईनगर येथे लवकरच खरेदी केंद्र सुरु करणार असल्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे. ११ केंद्रावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.