मयताच्या कुटुंबियांना धीर देत मदत मिळवून देणार : आ.मंगेश चव्हाण
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
वाकडी शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी वाकडी शिवारात घडली. या घटनेत मुलाचे वडील थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
योगायोगाने त्याचवेळी एका अंत्यविधीसाठी आ.मंगेश चव्हाण वाकडी गावात आले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपस्थित वीज महावितरण कंपनी आणि पोलीस प्रशासन यांना सूचित करून घटनेचा पंचनामा केला.
आमदारांनी घडविले माणुसकीचे दर्शन
याप्रसंगी आ.मंगेश चव्हाण यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत भावनाविवश होत चिमुकल्याचा मृतदेह हा चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाकडी गाव हे आमदार यांच्या मामाचे गाव असल्याने त्यांचे गावाशी वेगळे नाते आहे. आमदार यांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्त पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
दोषींवर कारवाईच्या सूचना
या घटनेत जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आ. मंगेश चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या. ‘महेश’च्या मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जे नुकसान झाले आहे ते न भरून निघणारे आहे. मात्र, वीज महावितरण कंपनी आणि शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मयताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन आ.चव्हाण यांनी दिले.