साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
तांत्रिक अडचणीच्या ग्रहणामुळे वरणगाव शहरात १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाणीपुरवठा कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याचाही आरोप होत आहे. याकडे वरणगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वरणगाव शहराला सात किलोमीटर अंतरावरील तापी नदीच्या पात्रातील पाण्याची उचल करून पुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठ्याला वारंवार तांत्रिक अडचणीचे ग्रहण लागत असल्याने शहरवासीयांना १५ दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप केला जात आहे. शहरातील जलवाहिनीला वारंवार लागणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराला दुरुस्तीच्या कामाची मजुरी वेळेवर मिळत नसल्याने दुरुस्तीच्या कामात विलंब होत असल्याने त्याचाही पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणी पुरवठ्याची मदार कर्मचाऱ्यांवर
वरणगाव शहराला रेल्वेस्टेशन, मकरंद नगर, शिवाजी नगर व नारीमळा अशा चार जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी २५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना अल्पशा कर्मचाऱ्यांवर पाणीपुरवठ्याची मदार अवलंबून आहे. त्यामध्ये तापीनदी जॅकवेल ४, जलशुद्धीकरण केंद्र ३, नारीमळा जलकुंभ ३, शिवाजी नगर, मकरंद नगर जलकुंभ ३, विकास कॉलनी व स्मशानभुमी गाव हाळ १ , खिडकी वाडा, मन्यार दरवाजा, रावजी बुवा, आठवडे बाजार गावहाळ व शौचालय १, रेल्वेस्टेशन जलकुंभ १ अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यातही या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नियोजनपूर्वक अंकुश नसल्याने काही कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.
सार्वजनिक शौचालयातही पाण्याचा अभाव
शहर हगणदारी मुक्तीसाठी नगरपरिषदेच्यावतीने लाखो रुपये खर्च करून ठिकठिकाणी सुविधायुक्त सुलभ शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. शौचालयाचा स्वच्छतेचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, शहरातील पाणी पुरवठ्याचा फटका शौचालयातील पाणी पुरवठ्यालाही बसत असल्याने सार्वजनिक शौचालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शौचालयासह नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवरील उपायासाठी कचरा डेपो, आंबेडकर नगर, मच्छींद्रनाथ नगर, वामन नगर, फायर स्टेशन, वंजारी वाडा ( शौचालया लगत ), झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, पवन नगर, लुंबिनी नगर आदी भागातील कुपनलिकासाठी मागील वर्षापासून कुपनलिकांचा प्रस्ताव देण्यात आला असून हा प्रस्ताव शासन दरबारी धुळखात पडला आहे.
अशा प्रकारे केला जातो पाणीपुरवठा
शहरातील चार लाख लिटर क्षमता असलेल्या मकरंद नगर भागातील जलकुंभातून मकरंद नगर, हिना पार्क, अयोध्या नगर, सरस्वती नगर, गणपती नगर, जगदंबा नगर, साईनगर, वल्लभ नगर, मच्छींद्रनाथ नगर, जालींदर नगर, स्टेशन रोड, वेल्हाळे रोड, गोरक्षण व श्रीकृष्ण मंदिर तर नारीमळा भागातील ६ लाख ३० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभातून जुन्या गावासह डॉ.आंबेडकर नगर, प्रतिभानगर, गंगाराम कॉलनी, मरीमाता मंदीर परिसर, रामपेठ अशा भागात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शिवाजी नगर व नारीमळा भागातील नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू केल्यास शहरातील पाणी पुरवठा टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. यासाठी या दोन्ही नवीन जलकुंभातूनही पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.
पाणी पुरवठा वीज बिलाची ९५ लाख रुपये थकबाकी
पाणी पुरवठा योजनेवरील वीज बिलाची ९५ लाख रुपये थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वीज महावितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी योजनेवरील वीज पुरवठा खंडीत केल्यास तसेच तापी नदी पात्रातील आवर्तनाअभावी पाण्याची पातळी खालावल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरवासीयांवर उन्हाळ्यातील पाणी पुरवठ्याचे ग्रहण गडद होण्याची दाट शक्यता असल्याने शहरात पाण्याची टंचाई हा प्रश्न मोठा गहन होत आहे.