साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर
येथील स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत अनेक सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांनी केवळ पोकळ घोषणा करून गावासाठी काहीतरी करत आहोत, या गावासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे आहे, असे दाखवित होते. त्यांनी अनेकदा गावासाठी लागणारी रुग्णवाहिका कागदावरच दाखवली होती. मात्र, साकेगावचे प्रभारी सरपंच सागर सोनवाल, साकेगावच्या प्रभारी ग्रामविकास अधिकारी कांचन बादशहा यांच्या माध्यमातून अखेर साकेगावला रुग्णवाहिका मिळाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच गुरुवारी सकाळी प्रथमच रुग्णवाहिका घेण्यासाठी येथील शोरूमला साकेगावचे प्रभारी सरपंच सागर सोनवाल, ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी कांचन बादशाह, ग्रामपंचायत सदस्य पती गजानन पवार यांच्यासह अन्य रुग्णवाहिकेची चावी घेतांना उपस्थित होते.
येथील स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत अनेक मोठ्या घोषणा करत असते. मोठा गाजावाजा करत असतात. मात्र, ज्या गोष्टींची गरज होती, अशी प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारी रुग्णवाहिनी नव्हती. तत्कालीन रेल्वे कर्मचारी शकील पटेल यांनी स्वखर्चातून अनिल पाटील सरपंच होत असतील तर मी त्यांना रुग्णवाहिका घेऊन देतो. त्यासाठी शकील पटेल आणि भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या माध्यमातून साकेगावात एक रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र, ही रुग्णवाहिका खराब झाल्यामुळे गावात एकही रुग्णवाहिका नव्हती. गावाची लोकसंख्या तब्बल वीस ते पंचवीस हजारच्या आसपास आहे. गावाला लागून असणारा राष्ट्रीय महामार्ग सहा जातो.
राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा घात-अपघात होत असतात. तसेच साकेगावला शिक्षणाचे हब म्हणूनही ओळखले जाते. गावात गोदावरी फाउंडेशन तसेच चैतन्य महाविद्यालय तसेच यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्टमार्फत मोठे महाविद्यालय सुरू आहे. त्यात बाहेर जाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. त्या अनुषंगाने गावात एक रुग्णवाहिका असणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आता रुग्णवाहिका मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
