साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
येथून जवळील पिंपरूड येथील दिव्यांग, सामाजिक, बहुउद्देशीय संस्था (राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ) तर्फे राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान तथा दिव्यांग बांधवांना ब्लँकेट व साहित्य वाटप, दिव्यांग बांधवांच्या मुलांना स्कुल बॅग, रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी फैजपूर शहरातील पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, पेन, डायरी देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ हे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना मदत तसेच पत्रकारांचा सन्मान करीत असतात. सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित एक निस्वार्थ काम करणारी संस्था म्हणजेच दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय (राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ) हे स्वतः दिव्यांग मित्र परिवार आहे. समाजातील प्रत्येक कार्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. सहा. पोलीस उपआयुक्त दिलीप सूर्यवंशी, साहित्य भूषण लेखक धनंजय कोल्हे जळगाव, सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या हस्ते पत्रकार व दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी धनंजय कोल्हे होते.
यावेळी दिलीप सूर्यवंशी यांनी पत्रकार व दिव्यांगांना मार्गदर्शन करुन संस्था (राहुल कोल्हे मित्र) परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. पत्रकार संजय सराफ यांनीही मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, विशाल दांडगे, पराग वारके, चिराग पाटील, चेतन तळेले, भगवान कोळी, स्वाती कोल्हे, रूपाली वारके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ९० टक्के दिव्यांग असलेले कमलेश देशमुख हे आसाम येथून स्वतः तीन हजार कि.मी. नॅनो गाडी चालवित आले होते, हे विशेष.
सन्मानार्थी पत्रकार
सन्मानार्थी पत्रकारांमध्ये वासुदेव सरोदे, प्रा. उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, निलेश पाटील, शेखर पटेल, संजय सराफ, अरुण होले, प्रा. राजेंद्र तायडे, फारुख शेख, शाकीर मलिक, राजू तडवी, विनोद कोळी, सलीम पिंजारी यांचा समावेश होता. तसेच दिव्यांग बांधव अशोक कोळी, विनोद बिऱ्हाडे या दोघं कुटुंबांना ब्लँकेट आणि त्यांच्या मुलांना स्कुल बॅग, इतर दिव्यांगांना ब्लँकेट तर सुरेश चव्हाण यांना कुबड्या देण्यात आल्या. बाळू चौधरी यांना ब्लाइंड स्टिक दिली. यावेळी संस्थाध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल तसेच दिव्यांग बांधवांच्या मुलांना शासनाच्या बाल संगोपन योजनेबद्दल माहिती देऊन फॉर्म भरून घेतले. यावेळी दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, जिल्हा सचिव हितेश तायडे, दिव्यांग बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय सराफ तर आभार मुन्ना चौधरी यांनी मानले.