साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची चाळीसगाव येथे रविवारी, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यावरील मोठ्या कॉलेजच्या ट्रॅक पटांगणावर विराट सभा होणार आहे. त्या सभेची जय्यत तयारी सभेच्या ठिकाणी केली आहे. सकल मराठा समाजाच्या बांधवानी सभेच्या ठिकाणावर भव्य नियोजन केले आहे.
दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानंतर मोठ्या कॉलेजचे ट्रॅक ग्राउंडवर चिखल झाल्यामुळे ग्राउंडवर ट्र्ॅक्टर, डंपरद्वारे मुरुम व खडीचा कच टाकून मैदानावर मराठा बांधवांना बसण्याची व्यवस्था केली आहे. विराट सभेला चाळीसगाव शहरासह तालुक्यातील तसेच भडगाव, पाचोरा, पारोळा, नांदगाव, कन्नड, येवला तालुक्यासह परिसरातील मराठा बांधव, भगिनी मराठा समाजाच्या विविध संघटना, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चाळीसगाव सकल मराठा समाजातर्फे केले आहे.