चाळीसगाव तालुक्यात ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम यशस्वी राबविला

0
20

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतच्या २१ हजार ३८१ विद्यार्थ्यांसाठी १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम चाळीसगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अनिल झोपे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या नियोजनातून ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम चाळीसगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दहा दिवसांचा कृती कार्यक्रम आखला गेला होता. या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवस निहाय गणिताच्या मूलभूत क्षमतांचे अध्ययन व अध्यापन करण्याचे नियोजन केले गेले होते. गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, भागाकार अशा क्रियांचा समावेश केला होता. दहा दिवसांमध्ये फक्त गणित विषयाचे अध्यापन करण्याच्या शिक्षकांना सूचित केले होते. रोजच्या रोज त्याचा आढावा केंद्रनिहाय केंद्रप्रमुखांकडे शाळांनी दिलेली माहिती संकलित होऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालय, चाळीसगाव येथे त्याची एकंदरी करून जिल्ह्याला पाठविण्यात येत होते. विद्यार्थ्यांचा गणिताचा पूर्वीचा स्तर व दहा दिवस गणित या उपक्रम राबविल्यानंतरचा स्तर उंचावलेला दिसत आहे.

‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल शिक्षकांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी दहा दिवस गणिताचे उपक्रमाची मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. मूल्यमापन चाचणीमधून विद्यार्थ्यांचा स्तर उंचावलेला दिसत आहे. दररोज गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी व केंद्रांचे केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून शाळा भेटी केलेल्या आहेत.

गटशिक्षणाधिकारी विलास भोई म्हणाले की, शाळा स्तरावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. गणित साहित्याच्या माध्यमातून, गणित पेट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन केले गेले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व गणिती क्रियांचे दृढीकरण होण्यासाठी उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला. निश्चितच उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञान व गणिती क्रिया क्षमतांमध्ये वाढ झाली. त्यातून गुणवत्ता विकास होण्यास मदत झाली.

-डॉ.ओमप्रकाश थेटे (उपशिक्षक), जि. प. प्राथमिक शाळा, पिंपळगाव प्र.दे.

‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रमात ठरविलेल्या क्षमतानुसार चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यात आली .या उपक्रमात खरोखरच विद्यार्थ्यांना काही नवीन पद्धतीने गणित शिकण्याची संधी मिळाली. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणिताची क्षमता उंचावली आहे. भविष्यात असेच काही नवीन उपक्रम येणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही नवीन भेटल्यासारखे होईल.

-सुवर्णा बाविस्कर, पदवीधर शिक्षक, जि. प. उच्च प्रा. शाळा, बेलदारवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here