साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे गिरणा धरणाच्या पाटाच्या पाण्याची शेतकऱ्यांना शेती पिकासाठी अत्यंत गरज आहे. त्या अनुषंगाने धरणगाव तहसील कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालय येथे पाटाच्या पाण्याचे २/३ आवर्तन सोडण्याविषयी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे.
यासाठी शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ यांच्या बालकवी रस्त्यावरील कार्यालयात शिवसेना उबाठाच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी केले आहे.