जीएसटी अधिकारी सांगून गंडविणाऱ्या तोतयाला जळगावातील व्यापाऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

0
16

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

तुमचे जीएसटी रेकॉर्ड योग्य नसल्याचे सांगत आपल्याकडे जीएसटीची धाड टाकली जाणार आहे. असा बागुलबुवा दाखवत उद्योजकांना गंडविणाऱ्या एका तोतया जीएसटी अधिकाऱ्याचा उद्योजकांच्या एकजुटीमुळे पर्दाफास झाला असून या तोतयाविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये गेल्या दोन, तीन महिन्यापासून एक ५० वर्षीय इसम ‌‘महाराष्ट्र शासन ‌’असे लिहिलेली गाडी (एमएच १९ सीवाय ००२५) घेऊन फिरत होता. हा इसम उद्योजकांना या ना त्या कारणाने तुमच्या हिशेबात त्रुटी आहेत. त्यामुळे तुमच्यावर जीएसटीची रेड होणार आहे. असे सांगत उद्योजकांना भीती दाखवत त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा उकळत असल्याचा उद्योग सुरू होता. दरम्यान या महाशयाने एका उद्योजकास चार, पाच दिवसापूर्वी तुमच्याकडे जीएसटीचा छापा पडणार असून मला मोठ्या साहेबांनी तुमच्याशी बोलायला पाठविले आहे, असे सांगितले. मोठे साहेब नाशिक येथील चौरसिया नामक असल्याचे सांगत त्याने मोबाईलवरूनसंबंधित उद्योजकाला तथाकथित चौरसिया नामक अधिकाऱ्याशी बोलणेही करून दिले. मात्र उद्योजकास या संदर्भात बनावटपणा दिसून आला. तसेच उद्योजकाने त्यास रक्षाबंधनाच्या सणानंतर आपण भेटू असे सांगितले. त्यानुसार हे महाशय पुन्हा एमआयडीसी परिसरात शुक्रवारी आले होते. त्याने उद्योजकांकडे मोठ्या रक्कमेची मागणी केल्याचे समजते. या तोतयाकडे उद्योजकांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता ते नव्हते. तसेच बोलत असतांना तो कधी अधिकारी असल्याचे सांगायचा तर अधिकाऱ्याकडे चालक म्हणून काम करतो असे सांगायचा. शेवटी उद्योजकांनी त्यास एमआयडीसी पोलिसात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या तोतयाने त्याचे नाव भाऊसाहेब दशरथ ठाकरे असे सांगितले असून तो शहरातील यशवंत कॉलनीमधील चर्चच्या मागील भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये रहिवासाला असल्याचे त्याने सांगितले. एमआयडीसी पोलिसात तक्रार नोफ्लदण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here