मुंबई :
कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेले दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई हे मदत मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडेही गेले होते. पण उद्धव ठाकरे यांनी नितीन देसाई यांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी त्यांच्याकडे गेलेल्या अनेक मराठी उद्योजकांना अशीच वागणूक दिली. त्याची यादी मी लवकरच जाहीर करेन, असेही दरेकर यांनी सांगितले. त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन याबाबत सविस्तर भाष्य केले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपचे खासदार आणि स्टार प्रचारक असलेल्या सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव रोखण्यासाठी २४ तासांत हालचाली झाल्या पण याच भाजपने नितीन देसाई यांना कोणतीही मदत केली नाही. नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजपच्या अनेक नेत्यांना भेटले होते. मी त्यांची नावं सांगणार नाही. पण नितीन देसाई डोळ्यात पाणी आणून या भाजप नेत्यांना, ‘माझं स्वप्न वाचवा’, असे सांगत होते. पण भाजपच्या नेत्यांनी त्यांना मदत केली नाही, असा आरोप राऊत यांनी केला.
संजय राऊत यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रवीण दरेकर यांनीही तितकेच गंभीर आरोप केले. नितीन देसाई हे उद्धव ठाकरेंकडे मदतीसाठी गेले होते, अशी खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे. संजय राऊत नितीन देसाई यांच्या मृत्यूचे भांडवल करत आहेत. त्यांनी देसाई हे उद्धव ठाकरेंकडे गेले होते की नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान संजय राऊतांना दिले.